एक होती भिंगरी...भाग १० ...द कमबॅक!!

 आधीचे भाग

भाग १ इथे वाचा- द कमबॅक... भाग १-

भाग २ इथे वाचा एक होती भिंगरी .. भाग २
भाग ५ पुढे वाचा एक होती भिंगरी.... भाग ५
भाग ६ पुढे वाचा. भिंगरी भाग ६
भाग ७ इथे वाचाभिंगरी...
भाग ८ इथे वाचा एक होती भिंगरी भाग ८
भाग 9 इथे वाचा  एक होती भिंगरी भाग

भाग १० पुढे वाचा-  एक होती भिंगरी...भाग १० ...द कमबॅक!!


त्या चौदा वर्षाच्या भावनेत आता भावनांचे अवशेषही उरले नव्हते. रडून अश्रू कधीच संपले होते. दादाच्या मागे पुढे करत आयुष्याची स्वप्न बघणारी आज कधीच मेली होती. आणि कदाचित त्या जागी तिच्या राखेतून एक नवीन व्यक्ती जन्मली होती. मरणाची भीती आता राहिली नव्हती आणि ह्याच मरणाला जसं तिने मनापासून स्वीकारलं होतं. मनातच एक गोष्ट पक्की केली, “ज्यांनी माझं जग उद्ध्वस्त केलंय, त्यांना संपवूनच मरणार."
ती बदल्याची ज्वाला तिच्यात पेटून उठली होती. त्या विचारानेच तिच्या अंगात वेगळीच ताकद संचारली. खोलीचं दार भावनाने उघडलं, सर्व बायका तिच्याकडे बघत होत्या, समोर बसलेल्या आपाकडे ती गेली आणि म्हणाली, “आपा आजसे मै आप जो बोलो.... आज भावना मर गई, अभी आपके सामने भिंगरी खडी है! आप तालीम दो, मी तयार हाय... एका पायावर घुमायला... जोपर्यंत समोरच्याला गड्ड्यात दाबणार नाही ना मी घुमतच राहणार.”

भावनाला असं खंबीर झालेलं बघून, आपामध्ये हिंमत आली होती. जी ती करू शकली नाही ते तिला भावना कडून करून घ्यायचं होतं. तिला गुण्या भाईच्या बरोबरीच उभं करून त्याच्या उभ्या केलेल्या विश्वाला आगीत भस्म करायचं होतं.
आपा आनंदात उठली, तिने तिच्या कपाळावर ओठ टिपले, तिला गच्च आलिंगन दिलं आणि म्हणाली, “बेटा, मी आहे तुझ्या सोबत... तुझा बदला माझा बदला... पण आधी तू बदल. हवामे खुद की पसंद की महक लानी हो तो अत्तर खुद पे पहले छीडकना पडता है मेरी जान... आजसे मेरी जान है तू.”
तीने परत भावनाला गच्च मिठीत धरलं, आणि मनातच शपथ घेत होती, "गुण्या भाई... तू अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. पण आता तुझ्याच हाताने तयार झालेली ही आग तुझं संपूर्ण साम्राज्य जाळून खाक करेल."
आपाच्या ओठांवर हलकंसं स्मित उमटलं होतं, भावनाला गोंजारत तिला म्हणाली, “और हम आखरी दम तक तेरे साथ है बेटा... जा झोप, आराम कर, उद्यापासून तालीम सुरु करायची हाय... आणि भिंगरी बाई नाय... तुला मोठ्या लोकांत उठ बस करायची हाय... ‘झारा जान’....
भावनाने वेश्यालयात राहून स्वतःला असं बदललं की कुणीच तिला भावना म्हणून ओळखू शकत नव्हतं. भावना तिच्या भावाची भिंगरी होती पण आताती ‘झारा जान’ होती सर्वांसाठी...
गुण्या भाई त्या प्रकरणानंतर काही वर्ष भारताबाहेर कुठेतरी लपून बसून भारतावर राज्य करत होता. वर्ष धावत होती. मुंबई बदलत गेली. नवीन इमारती उभ्या राहिल्या होत्या, नवीन डॉन आले होते, पण भिंगरीच्या मनातला सूड मात्र दिवसागणिक अधिक जिवंत होत गेला. गुण्या कुठे काय करतो ह्याची खबर आपा चोख ठेवत होती. आणि ती आता तरुण झाली होती. तिच्या रुपाची चर्चा पूर्ण मुंबईत होती. आपा आता म्हातारी झाली होती पण भावना तिला आई मानून तिच्या सोबत राहत होती. तिने भावनाला तयार केलं होतं. आपाला भावनाला ह्या साऱ्यातून काढायचं होतं पण भावनाच सहज तिथून निघणं शक्य नव्हतं हेही ती जाणून होती. रोज रात्री दोघी गप्पा करत असायच्या, रात्री उशिरा भावना तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडायची, आणि आपा तिच्या केसांतून हात फिरवत बसायची. त्या क्षणी भिंगरी पुन्हा काही काळासाठी भावना बनून जायची. आपा अनेकदा म्हणायची, "चल पोरी... दूर कुठंतरी निघून जाऊ. हे सगळं सोडून दे."
पण भावना फक्त हसायची. कारण तिला माहीत होतं, ती आता त्या दलदलीत अडकलेली नव्हती. ती स्वतःहून तिथे थांबली होती. आपाने स्वतःचा मार्ग निवडायला स्वतंत्रही दिलं होतं तिला पण इथे राहून जे तिला कळत होतं ते माघार घेऊन कुठे मिळणार होतं. आपाने अरुणची माहिती काढण्याचा खूप प्रयत्न केला होता पण ती कधीच काहीच जाणून घेऊ शकली नाही.

इकडे गुण्या भाईही स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्यात व्यस्त होता. त्याचाही दबदबा वाढला होता. राजकारण, अंडरवर्ल्ड, पैसा आणि भीती यांच्या जोरावर त्याने स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं होतं. नवीन व्यवहार, नवीन माणसं आणि नवीन नवीन पोरींच्या नादात तो भावनाला कधीच विसरला होता. आणि त्यामागे आपाचाही मोठा हात होता. तिने भावनाला कायम त्याच्या नजरेपासून दूर ठेवलं होतं. गुण्या भाईला कधीही तिची आठवण होईल, तिचा शोध लागेल किंवा त्याच्या मनात संशय निर्माण होईल, अशी एकही संधी तिने दिली नव्हती..
आपाच्या मते भावना आता तयार झाली होती. तिने तिला वेश्यालयातच सर्व प्रशिक्षण दिलं होतं, फक्त जगायला नाही... तर समोरच्याला वाचायला. माणसांच्या चेहऱ्यांमागचे हेतू ओळखायला. त्यांच्या कमजोरी शोधायला. त्यांच्याकडून माहिती काढायला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवायला. तिची शाळा आपाने शिकवणी लावून पूर्ण केली होती. इंग्रजी बोलण्याचं प्रशिक्षण दिलं. वागणं, बोलणं, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली होती.
भावना आता पूर्णपणे बदलली होती. गावातल्या त्या निष्पाप मुलीचा मागमूसही उरला नव्हता तिच्यात... मुंबईच्या उच्चभ्रू वर्तुळात आता तिची ओळख ‘झारा जान’ म्हणून होती. मोठमोठे उद्योगपती, राजकारणी, परदेशी पाहुणे, अंडरवर्ल्डशी संबंधित लोक अनेकांच्या चर्चेत तिचं नाव यायचं. तिच्या सौंदर्याची चर्चा रात्रीच्या पार्ट्यांमध्ये व्हायची, पण कुणालाच माहीत नव्हतं की ती प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद आणि प्रत्येक चेहरा लक्षात ठेवत होती. मोठं मोठया बिजनेस मॅनला प्याल्यात बुडवाची, तिच्या एका रात्रीची किंमत सामान्य माणूस देऊच शकत नव्हता. जगभरात लोकं तिचे दिवाने होते.
अशातच त्या दिवशी दुबईच्या डॉनची भारतात व्हिजिट होती ज्याला अंडरवर्ल्ड जगात ‘साहेब’ नावाने हाक मारली जायची. आणि आपा जानकडे रात्रीसाठी मुलीची डिमांड आली, आपा सर्वांना ओळखून होती. मग दुबईच्या डॉनसाठी तिने भावनाची निवड केली. भावनाला काय करायचं होतं हे कळालं होतं. तिच्यासाठी हीच गोल्डन संधी होती. दुबईचा डॉन काही दिवसातच भिंगरीचा नादात दिवाना झाला आणि त्याने तिला सोबत घेऊन जाण्याची डिमांड केली. आपाच्या आणि भावनाच्या प्लॅननुसार सारं काही घडत होतं.

मुंबईत गुण्या भाईची दहशत अजूनही होती. गुण्या भाईला मात द्यायची म्हटलं तर त्याच्यापेक्षा मोठया गुंडाची साथ असणे गरजेचं होतं. दरम्यानच्या काळात तिच्यावर नजर ठेवली जात आहे हे आपाच्या लक्षात आलं होतं, नवीन इन्स्पेक्टर अंकित जाधव नेहमीच्या पार्ट्यांमध्ये तिला सारखं वेश बदलून फॉलो करत असायचं... त्या दिवशी अचानक तिने त्याला हटकलं, “कोण आहेस तू?”
“मी प्रेम दिवाना आहे तुझा... अमित बोलतात लोकं मला”
भावना जरा वेळ गोंधळली होती... त्याच्या डोळ्यात तिला खूप काही जाणवत होतं, तरीही भावांना आवर घालत ती पुढे बोलली,
“हुम्म्म... माझ्या काय तू कामाचा... माझ्या एका दिवसाची किंमत माहित आहे तुला?”
“हो... पण मी फक्त प्रेम देऊ शकतो तुला, पैसे नाही...”
“जा निघ... मी तुझ्यासारख्यांना भीकही देत नाही, बऱ्या बोलणे माझ्या मागे येणं सोड नाहीतर तुला जग बघताच येणार नाही...”
“मग अजूनही मी जिवंत का आहे? तुला आवडतो मी... तुला कितीतरी दिवसाचं माहित आहे माझ्याबद्दल... कशाला करतेस हे सारं?”
तेवढ्यात अचानक तीचा फोन वाजला आणि त्याला धक्का देत ती निघून गेली... आपाने असं काही जाळं विणलं की भावना अंकितला दिसणे बंद झालं... तिचं अस्तित्व मुंबईमधून नष्ट केल्या गेलं होतं. भावनानेही दुबईच्या डॉनच्या आग्रहास्तव त्याच्या सोबत दुबईला जाणं, आणि फक्त त्याची होऊन राहणं मान्य केलं... आणि ती विमानात बसून दूर दुबईत पोहचली... तिच्या भावना परत उभ्या झाल्या होत्या. लहानपणी बघितलेली सर्व स्वप्न तिची पूर्ण होतं होती पण मार्ग मनाला आनंद देत नव्हता.
हळूहळू ती साहेबजीचा सर्व कारभार बघायला लागली. आणि त्याला स्लो पॉइझन देत राहिली. नंतर तो तिच्यावर इतका निर्भर झाला की फक्त तिचं हुकूमत करत होती त्याच्या नावावर... दुबईच्या साहेबजीने खूप प्रगती केली, सर्व जगात सत्ता पसरवली, अंडरवर्ड मधला राजा होता तो. आणि त्याला चालवणारी राणी होती भिंगरी! तिला आता लोकं मॅडमजी म्हणून हाक मारत असत. साहेबजीची प्रकृती हळूहळू बिघडत होती. भावनान त्याच्या जवळच्या सर्वांना विश्वासात घेऊन काही ना काही देऊ केलं होतं. साहेबजिचा अंत कुणालाही माहित होता कामा नये ही तिची योजना होती.

आणि मग एक दिवस मॅडमजीने गुण्या भाईशी हात मिळवला. त्याच्या जाळ्यातून बटाटा भाईला फोडलं, मुबईची सत्ता बटाटा भाईला देऊ केली आणि त्याच्याकडून गुण्या भाईंबद्दल सर्व माहित काढून घेतली... आणि ती पूर्ण प्लॅनिंगने रिंगणात उतरली.
एकीकडे तिने गुण्या भाईशी साहबेजींच्या मदतीने मैत्री ठेवत त्याला कंगाल केलं तर दुसरीकडे त्याच्या मुलीवर अमेरिकेत नजर ठेवून तिला भारतात येण्यासाठी तयार केलं.
संधी निर्माण केली आणि तिला किडन्याप करून तिच्याच गावातल्या घरी कोंबून ठेवलं होतं. तिला स्वतःची आपबिती सांगून तिच्या मदतीने तिचे व्हिडीओ तयार केले आणि गुण्या भाईला तोडण्यासाठी वापरले. आणि आता सध्या सोना ही आपाच्या ठिकाणावर सुरक्षित होती कारण मागच्या सात दिवसापासून अँकी तिच्या मार्गावर होता.
कथा परत वर्तमान काळात...
अँकीने आवाज दिला, “भावना भावनांना आवर घाल, आता पुढे काय... ए भिंगरी? की झारा जान?”
झारा नावं ऐकताच भावना रागात आली आणि तिने अँकीच्या पायाजवळ गोळ्या झाडल्या, घामाने भिजली होती, श्वास फुलले होते, अँकीच्या डोक्यावर बंदूक ताणून ती म्हणाली,
“अबे ए लंपट, तू कोण आहेस? आणि दादाला कसा ओळखतो? अन् झारा जान कोण लागते तुझी...”
अँकी किती वेळचा भावनाला सहन करत होता, त्याचा बांध तुटला, तोही आता ओरडला, “आधी मला सोड मग सांगतो. नाहीतर जा, घाल गोळ्या.”
भावनाने पिस्तूल तोंडात धरली, आणि त्याला बांधलेली रस्सी ती काढत होती. तिचे विस्कटलेले केस वाऱ्याने उडत त्याच्या चेहऱ्यावर येत होते. ती रागाने त्याच्याकडे पाहत होती, पण त्या रागामागे काहीतरी वेगळंच दडलेलं फक्त त्याला दिसत होतं. तिचं ते एकतार त्याच्याकडे नजर रोखून बघणं अँकीला घायाळ करत होतं. तिचा रागेट चेहरा त्याला सुंदर दिसत होता, अँकी तिच्याकडे एकटक बघत होता. तिचे ते बोलके डोळे... गालावर येणारी ती बट... आणि सतत स्वतःशी झुंज देणारं तिचं मन... त्याला सगळंच मोहून टाकत होतं.
रस्सी सैल होताच तो हळूहळू उभा राहिला. क्षणभर दोघेही एकमेकांसमोर निःशब्द उभे राहिले. जणू काळ थांबला होता. भावनाच्या मनात अनेक वर्षांची विसरलेली प्रेमाची भावना हलकेच डोकं वर काढत होती. ज्या मनाने सूडाशिवाय दुसरं काहीच मान्य केलं नव्हतं, त्या मनात अचानक आपलेपणाचा एक कोवळा किरण शिरत होता. ती डगमगली तसा त्याने तिचा तोल सांभाळला आणि संधी मिळताच तो तिला बिलगला, आणि दोघेही स्पर्श सुखाने मोहरले, भावना जरा वेळ मनात बावरली, भरकटली, मनाच्या कप्या कप्यामध्ये दडून असलेलं आपलंपण तिला क्षणात परत जाणवलं...

जणू ती ह्याच स्पर्शच्या प्रतीक्षेत होती. क्षण जणू दोघांना गुंतवत होता, आणि अँकीने त्याचे ओठं तिच्या ओठापर्यंत आणून ठेवले, श्वासांची गरमी वाढली... अँकीने अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेली एक बट कानामागे सारली. नजरा एकमेकांत अडकल्या होत्या. आणि ती त्याच्यात गुंग झाली होती...
आणि तेवढ्यात भावनाला अचानक भानावर आली. ती झटकन मागे सरकली. क्षणात तिच्या चेहऱ्यावरचा कोमलपणा नाहीसा झाला आणि परत तोच कठोरपणा परतला. आणि तिने मोठया ताकतीने त्याला खाली पाडलं, त्याच्या छातीवर पाय ठेवला आणि म्हणाली, “शेवटचं विचारते तुला... तू, माझा दादा... माझ्या दादाला कसं ओळखतॊस?”
“अरे थांब.”
म्हणत त्याने त्याच्या खिश्यातुन त्याच कार्ड काढलं, आणि भावनाच्या हातात दिलं, “इंस्पेक्टर अंकित जाधव, क्राइम ब्रांच.”
नाव वाचताच परत भावनाने बंदूक परत ताणली,
“मग, मी काय करू... माझं काही नाही बिघडवू शकत तू... आणि मी काही माझा बदला थांबवणार नाही.... माझी सत्ता ह्या मुबईवर आधीच आहे... मी एक फोन केला ना तरी तू खल्लास होशील... मी साहेबजीची सेक्रेटरी कधीच नव्हती.... मी स्वतः साहेबजी आहे... साहेबजी कधीच गचकला, साले माणसं, बे दुने एकच... मारलं त्याला मी पण अजून जिवंत ठेवलं आहे सर्वांमध्ये. लोकं तर त्याला शोधत आहेत मला नाही. आज सर्व माझ्याशी बिजनेस करायला तयार आहे... इथले सर्व नेते आणि सर्व पोलीस खातं मी माझ्या इशाऱ्यावर चालवू शकते.... तू काय माझं काही बीघडवणार... बोल माझ्या दादा सोबत काय झालं होतं.”
अंकित गुमान बसला आणि शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने त्याचा चेहऱ्यावरचा मास्क काढला... तशी भावना गडबडली, “अमित, तू? आणि अंकित जाधव, क्राइम ब्रांच, कधी...”
“अजूनही चेहरा अन् नाव ओळखीचा आहे तुला माझा.... तरीही नकार देते आहेस तू. त्या दिवशी नंतर तू दिसलीच नाहीस गं, आणि आता दिसत आहेस, तू माझ्या सोमोर होतीस, मला तुझ्याशी बोलायचं होतं. तुझ्याच शोधत आलो होता पण तू भेटलीस तशी निघून गेलीस. तू तुझं नाव मला सांगितलं पण ते भावना नव्हतं ग, का केलंस असं?”
“जो खोटं बोलून माझ्या प्रेमाची वाट बघत राहिला, त्याची मी का पर्वा करायची? वेश बदलून मागे लागने तुझी जुनी सवय आहे... तेव्हाही तू तुझं काम करत होतास आणि आताही करत आहेस. तेव्हाही मी तुझ्या हातातून निसटून गेले होते... आणि आजही जाणार. तू बस तुझं प्रेम-दिवाना, दिवानगी करत.”
अँकी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला.
“तू आजही तशीच आहेस गं.”
“मला माहीत आहे काय बोलायचं होतं तुला... साला मला त्यात पडायचं नाही, सालं प्रेम बीम करायला मला वेळ नाही...”
तिने मुद्दाम नजर चुकवली. अँकी हलकंसं हसला. “असं म्हटल्याने संपतं का गं सगळं?”
“आता मी सगळं संपवणार आहे. तू काहीच करू शकत नाहीस. मला काही पर्वा नाही.”
“माझी पण नाही?”
“जो खोटं बोलून माझ्या प्रेमाची वाट बघत राहिला, त्याची मी का पर्वा करायची? तेव्हाही तू तुझं काम करत होतास आणि आताही करत आहेस. तेव्हाही मी तुझ्या हातातून निसटून गेले होते... आणि आजही जाणार. तू बस तुझं प्रेम-दिवाना, दिवानगी करत.”
अँकी काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला.
“तू आजही तशीच आहेस गं.”
“ए जास्त बोलू नकोस, तुला काय माहीत आहे ते सांग. बोल पटापट तुझी काय स्टोरी आहे ते... वेळ नाही माझ्याकडे. हा फालतूपणा करण्यासाठी”
भावनाच्या कपाळावर आठ्या पडल्या.
“ए, जास्त शहाणपणा नको करू. मला वाचायचा प्रयत्न करू नकोस.”
“तू गुण्या भाईचा बदला घ्यायला निघाली आहेस. पण रागाच्या आगीत इतकी जळाली आहेस की स्वतःलाच राख करून टाकते आहेस.”
“राख? मी कधीच झाले आहे...”
“तू जितका गुण्या भाईचा द्वेष करतेस ना... त्यापेक्षा जास्त मी तुला हरताना बघण्याचा द्वेष करतो.”
“का? तुला काय पडली आहे माझी... “
काही क्षण दोघेही शांत झाले. बाहेर वारा सुटला होता. आत मात्र दोन हट्टी मनं एकमेकांसमोर उभी होती... एक सूडासाठी जगणारं... आणि दुसरं तिच्यासाठी...
कथा शेवटच्याभागाकडे लवकरच...
© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com
९३७०१९४६३७
----
सादर कथा ही गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर आधारित काल्पनिक कथा आहे. कथानकातील पात्रे, प्रसंग, भाषा आणि घटना यांचा उद्देश त्या जगातील वास्तववादी वातावरण उभे करणे हा आहे.
कथेतील काही संवाद, व्यक्तिमत्त्वे किंवा घटना वाचकांना अस्वस्थ वाटू शकतात. कृपया त्याकडे त्या पात्रांच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात पाहावे. लेखक कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी, हिंसा किंवा बेकायदेशीर कृत्यांचे समर्थन करत नाही.
कथेचा आस्वाद घेताना तिच्या कथानकाला आणि पार्श्वभूमीला समोर ठेवून वाचन करावे, ही विनंती.
--
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार उर्मिला देवेन कडे राखीव. तेव्हा कृपया कथा C/P करू नये, लेखणीची आदर करा! माझ्यापेजवर ही कथा/ लेख वाचला जावा एवढीच इच्छा आहे.
पुढील अपडेटसाठी तुम्ही मनातल्या तळ्यात what's app ग्रुपही जॉईन करू शकता, ग्रुप लिंक पेज intro मध्ये आहे किंवा माझ्या पेजला फॉलो करू शकता.
स्टे कनेक्ट, स्टे सेफ...
फोटो साभार ai

Post a Comment

0 Comments